परप्रांतीय मारहाण प्रकरणी मनसेनेते राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता

Foto
ठाणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीला कलाटणी देणार्‍या २००८ मधील परप्रांतीय मारहाण प्रकरणातील पहिल्या गुन्ह्याचा आज (२१ मे २०२६) अंतिम निकाल लागला.  कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे भरतीसाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांवर मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी ठाणे मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने हा महत्त्वाचा निकाल दिला. मुख्य न्यायदंडाधिकारी (  ) अभिजीत व्ही. कुलकर्णी यांनी या खटल्याचा फैसला सुनावला.  या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते.

२००८ मध्ये झालेल्या घटनेचा निकाल १८ वर्षांनी सुनावण्यात आला. राज ठाकरे यांची ठाणे कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे राज ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टात सादर करण्यात आला पुरावा हा पुरेसा नव्हता. त्याशिवाय, काही पुरावे नियमाच्या अनुषंगाने नव्हते. आरोपी क्रमांक १ ते ७ यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप होता. मात्र, कोर्टासमोर सरकारी पक्षाने सादर केलेला पुरावा सादर करता आला नाही. आरोपी घटनास्थळी प्रत्यक्षात हजर होते, याचा पुरावा सरकारी पक्षाला सादर करता आला नसल्याचे कोर्टाने म्हटले असल्याचे राज ठाकरे यांच्या वकिलांनी म्हटले. मारहाण झालेले उमेदवार हे परप्रांतीय होते, त्यांना मारहाण करणारे कार्यकर्ते मनसेचे होते, हे सरकारी पक्षाला सिद्ध करता आले नसल्याचे कोर्टाने म्हटले.

काय होते राज ठाकरेंवर आरोप?
हे प्रकरण २००८ सालातील आहे, जेव्हा ऑल-इंडिया रेल्वे भरती परीक्षेसाठी महाराष्ट्रात, विशेषतः कल्याण परिसरात मोठ्या संख्येने परप्रांतीय उमेदवार आले होते. या खटल्यात राज ठाकरे हे आरोपी क्रमांक १० आहेत. राज ठाकरे यांनी मराठी तरुणांच्या नोकर्‍या परप्रांतीयांनी हिरावल्या असा आरोप करत भडकाऊ भाषण केल्याचा ठपका फिर्यादी पक्षाने ठेवला आहे. त्यांच्या याच चिथावणीखोर भाषणामुळे प्रवृत्त होऊन मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण रेल्वे स्थानकावर परप्रांतीय विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि रेल्वे मालमत्तेचे मोठे नुकसान केले, असा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणात एकूण ८ जणांवर गुन्हा दाखल होता, ज्यातील दोन आरोपींचा खटला प्रलंबित असतानाच मृत्यू झाला आहे.